एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: ‘या’ ६ हातांनी वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राण
अंदाजे दहा सव्वा दहा वाजेची वेळ… ट्रेन एल्फिन्स्टन स्टेशनवर पोहोचताच नेहमीप्रमाणं प्रवासी पादचारी पुलावरून इंडिया बुल्सच्या दिशेने निघाले. पूल उतरून पुढे जाणार इतक्यातच कानी आरडाओरडीचा आवाज ऐकू आला. शाॅर्ट सर्किट झालंय, पळा… पळा… उतरा… काही क्षणातच प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडू लागले, ओरडू लागले… रडू लागले.. गर्दीच इतकी होती की चेंगराचेंगरीमुळे फक्त नि फक्त किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले… रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इतर प्रवाशांना तुडवून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले.
अशा स्थितीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आणि फोटो, व्हिडीओ काढण्याच्या मोहात न पडता सर्वात पहिल्यांदा तीन तरूणांनी शेकडो प्रवशांना अक्षरश: खेचून बाहेर काढत त्यांचे जीव वाचवले. सागर जाधव (२३), रोहित पवार (२१) आणि विराज साळवी (२१) अशी या तीन धाडसी तरूणांची नावे.
हे आहेत ३ धाडसी तरूण
एल्फिन्स्टन पूर्वेकडील सनशाईन टाॅवरमधील जावरीस टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. या कंपनीत हे तिघेही काम करतात. यापैकी सागर हा वरळीत राहत असून रोहित आणि विराज दोघेही वांद्र्यात राहतात. नेहमीप्रमाणे एल्फिन्स्टन स्टेशनवर उतरून पादचारी पुलावरून हे तिघेही तरूण पलिकडे जाण्यासाठी निघाले. पूल उतरून खाली येताच त्यांच्या कानी किंकाळ्या पडल्या. मागे वळून पाहताच चेंगराचेंगरीचा धक्कादायक प्रकार त्यांना दिसला. यावेळी क्षणाचाही विलंब न करता हे तिघेही जखमी प्रवाशांची मदत करण्यासाठी धावले.
सागर, रोहित आणि विराज या तिघांनी गर्दीत अडकलेल्या, पडलेल्या अनेक प्रवाशांना खेचून बाहेर काढले. जखमींना त्वरीत अॅम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवत त्यांचे जीव वाचवले. या कामात इतर बघ्यांनी मोबाइलने फोटो आणि व्हिडीओ काढण्याचे सोडून मदत केली असली तर अाणखी अनेकांचे जीव वाचवता आले असते, अशी खंत तिघांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment